प्राथमिक विभागाबद्दल
पूर्वप्राथमिक प्राथमिक विभागातील विद्यार्थी हे ३ ते ९ या वयोगटातील असतात. हा वयोगट अतिशय संस्कारक्षम असल्याने पालकही तेवढेच संवेदनशील असतात सुशिक्षित व सुसंस्कारित पालकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावला गेला व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मध्ये आतापर्यंत ६३ विद्यार्थी, एम. टी. एस./ एम. पी. एस. पी. मध्ये ४१ विद्यार्थी चमकले. BDS, IPM सारख्या परिक्षांनाही हे विद्यार्थी बसतात व आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवतात. मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा त्याप्रमाणे तो घडतो म्हणूनच गुणवत्तावाढीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शाळेने नेहमीच प्रयत्न केला आहे.
नाट्य व नृत्य विष्कारातून शाळेला सन्मान मिळवून देणारा क्षण म्हणजे अवर्णनीय ! काही नाटकांची सफर तर ओरिसा पर्यंत जाऊन पोहोचली. राज्य, जिल्हा, तालुका व आंतरशालेय सर्व पातळ्यांवर शाळेने विविध पारितोषिके मिळविली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कृतिशील व सृजनात्मक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. उपक्रमांची मांदियाळी – काही वानगी दाखल! विज्ञान जत्रा, थीम बेस स्नेहसंमेलन, खेळ सावल्यांचा, जाहिरात एक कला, इकोफ्रेंडली स्पर्धा, बोरन्हाणं एक शिशु संस्कार, थाळी नृत्य, बाल महोत्सव, निवासी शिबीर, बोलक्या बाहुल्या, स्वर संध्या, बिजांकुर, दीपोत्सव, चला जाऊ या पुस्तकांच्या दुनियेत, यज्ञ एक संस्कार, मुक्तांगण, जल्लोष, क्षेत्रभेट, बाहुला-बाहुली लग्न इत्यादी. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘विद्यार्थी दत्तक योजना’ राबविली जाते.
संस्थेच्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळेतील ई लर्निंग सुरु करुन ज. ए. ई. ने एक नवीन पायंडा पाडला आहे.
मो. ह. विद्यालय तसेच शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना अनेक संस्थांनी सन्माननीय पुरस्काराने गौरविले आहे. अनेक कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, राजकारणी, गायक, अभिनेते, क्रीडापटु या शाळेत घडले. ठाण्यातील अनेक देणगीदार, जाहिरातदार, आश्रयदाते, यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी, निस्वार्थपणे अथक परिश्रम घेतले. असंख्य ज्ञात-अज्ञात सदस्य, शाळेचे अगणित हितचिंतक यांच्या ऋणातच शाळा राहील.