Back

वास्तु व परिसर... एक प्रवास!

आपली सध्याची शाळा ज्या शिवाजी पथावर आहे तो शिवाजी पथ ही शाळा जेव्हा या ठिकाणी स्थलांतरित झाली तेव्हा अस्तित्वात नव्हता. शाळेची हद्द ही सध्याचे काँग्रेसचे कार्यालय जे रस्त्याच्या पलिकडे आहे तिथपर्यंत होती. त्या ठिकाणी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार होते व बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी यांची ये-जा त्याच प्रवेशद्वारातून होत असे. शाळेची हद्द आणि जुने प्रभात टॉकीज यामध्ये तारेचे कंपाउंड होते.

मासूंदा तलावाच्या बाजूला आपल्या शाळेची हद्द सध्या आहे तिथपर्यंत होती. बाजूला साठे गादी कारखान्याचे स्वतःचे घर होते. त्या बाजूने शाळेमध्ये यायला प्रवेशद्वार नव्हते असे आठवते. शाळेचे दुसरे प्रवेशद्वार सध्या काँग्रेसचे कार्यालय आहे त्याच्या थोड्या अलीकडे नाल्यावर एक लोखंडी पूल होता. हा पुल अतिशय अरुंद होता. हा पूल पलीकडे वेसावकरांच्या हद्दीपर्यंत म्हणजेच सध्याच्या पॅराडाईज हाईट येथे संपत होता. तेथून आर्यक्रीडा मंडळाकडे जायला व स्टेशन कडे जायला चिंचोळी पायवाट होती. त्याच्या डाव्या बाजूला झोपडपट्टी होती. सध्या जिथे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत आहे त्या ठिकाणी एक टेकडी असून तेथेही झोपड्या होत्या. दिवसा त्या पायवाटेने प्रवास करायला भीती वाटत नसे. परंतु या टेकडीवर व डाव्या बाजूला चिंच, आंबा व इतर मोठमोठे वृक्ष असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी या रस्त्याने कोणी जात नसे. हा पूल फक्त शाळेच्या वापरासाठीच होता.

1957 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला ठाणे नगरपालिकेने पाठिंबा दिल्याने सरकारने ठाणे नगरपालिका बरखास्त केली व त्यावर देसाई नावाच्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. या प्रशासकांनी शाळेची जागा ताब्यात घेऊन सध्या शाळेची भिंत आहे तिथपर्यंतच आपली हद्द ठेवली. देसाई यांनी मासूंदा तलाव जवळजवळ अर्धा कमी केला व तेथून शिवाजीपथ तयार करण्यात आला.

मासूंदा तलाव हा सध्याचे महात्मा गांधी उद्यान किंवा भाजी मार्केट आहे तिथपर्यंत होता. ठाणे स्टेशन पासून जांभळी नाक्यापर्यंत जाण्यासाठी एकच सुभाष रोड किंवा जुना रस्ता अस्तित्वात होता. सध्याचे शाळेचे मैदान आहे त्या मैदानाची जागा ही आबासाहेब कुलकर्णी यांच्या मालकीची होती. आबासाहेब कुलकर्णी यांच्याकडून संस्थेने काही भाग विकत घेतला व तेथे शाळेचे मैदान तयार झाले.

खुला रंगमंच हा 1967 ते 68 या सुमारास बांधण्यात आला. हा खुला रंगमंच त्यावेळेस महाराष्ट्रातील उत्तम अशा खुल्या रंगमंचामध्ये गणला जात असे. तो सर्व सुखसोयींनी संपन्न होता. त्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था कायमस्वरूपात पाठारे यांना देण्यात आली होती. तसेच प्रकाश व्यवस्था ही कायमस्वरूपात लोकुरकर यांना देण्यात आली होती. खुर्च्यांची व्यवस्था कायम स्वरूपात कृष्ण स्टोअर्सला देण्यात आली होती. कृष्ण स्टोअर्सचे गोडाऊन शाळेचे मासूंदा तलावाकडील जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी होते. तेथे त्यांच्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्याला लागूनच नाटकांच्या तिकिटाच्या विक्रीची व्यवस्था होती. तेथे थोडासा कट्टा असून त्या ठिकाणी नाटकाच्या मध्यंतरामध्ये चहा पाण्याची व इतर अल्पोपहाराची व्यवस्था होत होती. सुरुवातीला त्याचा करार बक्षी व पाटणकर यांच्याशी करण्यात आला होता, त्यानंतर मात्र आपल्या शाळेचे अतिशय मेहनती सेवक कृष्णा काठे यांनी ते चालवण्यास घेतले. त्यावेळी तीन अंकी नाटक संपल्यावर शाळेच्या जुन्या शिक्षक कक्षामध्ये सर्व नट मंडळींची जेवण्याची व्यवस्था होत होती.

आपली शाळा खाडीवर असताना जी जागा घेतली त्या जागेचे भाडे संस्था देत होती. त्या सुमारास शाळेला 'मोतीलाल हरगोविंदास विद्यालय' हे नाव दिले.

जुन्या आठवणी ओठांवर हसू आणतात आणि डोळ्यात अश्रू!!!

'मोह'मय सुविचार