Back
manbindu

मुकुंद राम मराठे

संगीत आणि विज्ञानाचा अत्युच्च मेळ !

ज्येष्ठ कलाकार मुकुंद मराठे हे शास्त्रीय – नाट्य संगीत गायक, गायक नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक, संवादक, लेखक, खगोल अंतराळ तज्ञा, म्हणून ज्ञात असून, आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर, गायकीचे घरंदाज गायक संगीतभूषण पं. राम मराठे ह्यांचे सुपुत्र म्हणून सुप्रसिद्ध.

स्वतः उत्तम शास्त्रीय संगीत गायक असून आम रागाबरोबरच आपल्या परंपरेचे अनवट व जोडराग ते अतिशय लीलया पेश करतात।

मराठी संगीत रंगभूमीवरील गायक नट, संगीत मार्गदर्शक, नाट्य दिग्दर्शक व सर्व नाट्यांगे म्हणूनही त्यांचे अमूल्य असे योगदान आहे।

संगीत रंगभूमीचे गाढे अभ्यासक ,रंगभूमीचा इतिहास व अनेक आठवणी किस्से त्यांच्या संग्रही व मुखोदगत आहेत।

प्रचंड लोकसंग्रह व शांत निर्मळ स्वभावाचे असे मुकुंदजी सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. व्यावसायिक व प्रायोगिक अशा अनेकविध नाटकातून गायक नट म्हणून ख्यातकीर्त असणारे मुकुंदजी सुवर्णतुला, संशयकल्लोळ, शारदा, सौभद्र, मृच्छकटिक, जय जय गौरी शंकर, मातीच्या गाड्याच प्रकरण, पूर्णावतार, डफ, मेघमल्हार, दुनिया रंगरंगीली, एकच प्याला, मिलिंद जय जय, हे बन्ध रेशमाचे, सुरसंगम, पंतांची सून, मत्स्यगंधा, इ त्यातील काही नाटके, तसेच हिंदी व संस्कृत एकूण ४० हून अधिक नाटकातूनही त्यांनी काम केले आहे.

मुकुंद मराठे आकाशवाणीचे अ श्रेणी मान्यताप्राप्त कलाकार आहेतच. अनेकविध संगीत संकल्पनांवर देखील त्यांनी उत्तमोत्तम कार्यक्रम निर्मिती केली आहे, त्यामध्ये यमन मन भावन, की बोर्ड वाद्य कचेरी, साठोत्तर नाट्यसंगीत, नांदीगुणगान, आठवणीतील सूर, परंपरा, रियाझ कार्यशाळा,जोड अनवट राग, बिहागचे सगेसोयरे, रामरंग,पाईक परंपरेचे आपले गुरू पं राम मराठे, पं उल्हास कशाळकर, प्रदीप नाटेकर, यशवंत देव, स्नेहल भाटकर, शिवाय नाट्यगुरु गोविंदराव पटवर्धन, तुलसीदास बोरकर, भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर,शुभदा दादरकर, इ. तबला गुरू पं पंढरीनाथ नागेशकर, पं. भाई गायतोंडे व पखवाज गुरू पं. अर्जुन शेजवळ। संगीत व तबला दोहोंत उच्च श्रेणीमध्ये विशारद असून, संगीत नाटकांना व शास्त्रीय संगीत कार्यक्रमांना तबला साथसंगतही त्यांनी केली आहे।

संगीता व्यतिरिक्त शिवाय खगोल अंतराळतज्ज्ञ – वैज्ञानिक म्हणून सर्वश्रुत आहेत. सुवर्णपदकासह गणितामध्ये मुंबई विद्यापीठातून M. Sc. एम. एस्सी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून मुंबई विद्यापीठासह वरळीच्या नेहरू प्लॅनेटोरियम इथे मानद खगोल व्याख्याता वैज्ञानिक म्हणून काम केले आहे। अंतराळ खगोल शास्त्रावर आणि संगीत विषयक अनेक व्याख्यानं देखील देतात. विविध वर्तमानपत्र इ संगीत व विज्ञान विपुल लिखाण करत असून वडील पं. राम मराठे ह्यांचे वरील चरित्रात्मक 600 पानी असा नादब्रह्म स्वरयोगी हा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे.

मुंबई दूरदर्शन साठी विविध संस्थांची संगीत नाटके, व अनेक कार्यक्रम समन्वयक व सल्लागार म्हणून अनमोल कामगिरी करत आहेत, तसेच, खगोल मंडळ ह्या संस्थेचे माजी अध्यक्ष व उत्तम आकाश निरीक्षक आहेत। शिवाय इस्रो, आदी वेधशाळेत प्रकल्प अभ्यासक आणि संशोधनपर कार्यात सहभागी होते.
महाराष्ट्र शासन आणि मराठी नाट्य परिषदेचे बालगंधर्व पुरस्कार प्राप्त मुकुंद मराठे यांना संगीत आणि विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच १५ जुलै २०२२ ला अत्यंत मानाचा असा बालगंधर्व पुरस्कार त्यांना विद्यावाचस्पती पं. डॉ. शंकर अभ्यंकर ह्यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.

तसेच, कलाक्षेत्र चेन्नई ह्या अग्रगण्य अशा मातब्बर संस्थेवर सांस्कृतिक मंत्रालय, केंद्र सरकारतर्फे संचालक मंडळावर असून, नुकतीच केंद्र सरकारच्या सर्व भाषिक चित्रपट सेन्सॉर बोर्डावरती त्यांची नेमणूक झाली आहे.

ठाणे गौरव, गानवर्धन, कलासाधक पुरस्कार, उत्कृष्ट विज्ञान प्रचारक, अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण संघाचा २०२२ चा उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार, IBN लोकमत ठाणे, ICON इ. सुमारे 55 पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. संस्कार भारतीशी १९९२ पासून निगडित असून सध्या कोंकण प्रांताचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असले, तरी कार्यकर्ता हीच समर्पित भावना ठेवून १९९२ पासून काम करतात.
आपल्या एकुलत्या एक व सर्वश्रुत अभिनेत्री — गायिका अशा कन्येचा – स्वरांगी मराठेचा विवाह, सामाजिक बांधीलकी जपून, (कोविड काळ नसतानाही) 2016 मध्ये अल्प खर्चात करून, हा उर्वरित निधी विविध सामजिक , सांगीतिक संस्थांना अर्पण केला होता. ह्यासाठी मुकुंद मराठे व परिवार, समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे.

महाराष्ट्र शासन इ. ठिकाणी नाट्य, चित्रपट ज्युरी, परीक्षक म्हणून त्यांनी अनेकदा नि:पक्षपातीपणाने काम केलं आहे. संगीत विशारद आणि तबला विशारद ही पदवी उच्च श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या मुकुंद मराठे यांची पुढची पिढी आपल्या घराण्याची ही संगीत परंपरा व सामाजिक बांधिलकी अर्थात मराठेशाही समर्थपणे चालवत आहे.

असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे, मुकुंद मराठे!!!

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु!

मोह सुविचार