बातम्या
न भूतो न भविष्यती अमृत महोत्सव सोहळा श्री. रवींद्र कृष्णाजी तामरस
कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव अन वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेले मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या श्री. रवींद्र कृष्णाजी तांमरस सरांचा अमृत महोत्सव शाळेने 18 जानेवारी 2025 रोजी शाळेत आयोजित केला होता. आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, पुढाकार घेऊन हा सोहळा करणे म्हणजे एका कर्मयोगी शिक्षकांच्या जीवन प्रवासातील तो अत्युच्च आनंदाचा क्षण ठरावा. मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सरांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. डॉक्टर उल्हास कोल्हटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शैलेंद्र साळवी, माजी शिक्षक श्री. गणेश पेंडसे, श्री. सुबोध देशपांडे व मुख्याध्यापक श्री. विकास पाटील यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या सुवर्ण क्षणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमा केलेल्या निधीतून शाळेत अधिक दोन सौर ऊर्जा पॅनलचे उद्घाटन तामरस सरांच्या हस्ते केले.
धन्य ते शिक्षक ज्यांनी घडवले अशा विद्यार्थ्यांना. सरांच्या कार्याची, कर्तृत्वाची, अखंड सेवेची दखल उपस्थित प्रत्येकाने घेतली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्या प्रामाणिकपणाची निरलस सेवेचे भरभरून कौतुक केले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय अभय ओक यांनी ‘मी घडलो तामरस सरांमुळे…’ असे गौरवपर पत्र पाठवले. विविध क्षेत्रातील उच्च पदावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तामरस सरांच्या मनोगतातून बालपणापासून ते वयाच्या 75 पर्यंतचा चढता आलेख ऐकून सरांच्या अचाट आणि अफाट स्मरणशक्तीचे सभागृहांनी कौतुक केले. गुरुवर्य कै. अक्षीकर, एस. व्ही. कुलकर्णी, कै. चितळे सर यांच्या संस्कारांमुळे प्रेरणेमुळेच घडल्याचे सरांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ही त्यांनी कौतुक केले.
अशा हृद्य सोहळ्याचे सुवर्णक्षण अनेकांनी आपल्या मनात आणि कानात साठवून ठेवले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व सहकारी शिक्षिका सौ. स्नेहा शेडगे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या निवडक प्रतिक्रिया
तामरस सरांचा अमृतमहोत्सव आमच्या शाळेत (मो. ह. विद्यालय, ठाणे) साजरा झाला.
आज मी जो आहे त्यात तामरससर आणि त्यांचे काही कुटुंबीय यांचा सिंहाचा वाटा आहे. तामरससर यांनी माझे फिजिक्स दहावी आणि अकरावीमध्ये चांगले करून घेतले. त्यांचे मामा चितळेसर आम्हाला मो.ह.विद्यालयातच गणित शिकवत होते. तसेच त्यांच्या मावशी गोरेबाई यांनी शिव समर्थ विद्यालयात मी असताना माझा गणित आणि विज्ञान यांचा पाया पक्का करून घेतला. या सगळ्यांमुळे मी IIT ची प्रवेश परीक्षा सहज पार करू शकलो. आजही माझे फिजिक्स एकदम चांगले आहे.
तामरस सर हे शाळा कॉलेजपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. TIFR सारख्या संस्थेत जाऊन संशोधन करण्याची अथवा इंजिनियर होण्याची त्यांची मनीषा होती. परंतु काही कारणाने त्यांची ही मनीषा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांना शिक्षक होण्याची अजिबात इच्छा नव्हती. केवळ नोकरी मिळेपर्यंत करण्याचा उद्योग म्हणून ते आमच्या शाळेत नोकरीला लागले. थोड्याच काळात ते मुलांमध्ये एवढे रमले की त्यांनी याच शाळेत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला. तामरससर, विलास जोशी सर आणि खोल्लम सर या त्यावेळी शाळेत नव्यानेच दाखल झालेल्या तरुण पोरसवदा त्रिकुटाने आमचा विज्ञानाचा पाया भक्कम केला. त्या जोडीला गणिताचा पाया भक्कम करायला चितळेसर आणि भिडेसर हे बुजुर्ग शिक्षक होते.
तामरस सरांनी केवळ शाळेत उत्कृष्ट शिकविले नाही, तर शाळेच्या उच्च माध्यमिक विभागाला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवले. आजही मो. ह. विद्यालयाचा उच्च शिक्षण विभाग हा नावाजला जातो. तामरससरांनी त्याच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली होती. हे करत असतानाच त्यांनी मो.ह.विद्यालयाची मातृसंस्था जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनेक मान्यवर शाळा मुंबई परिसरात आहेत. दादरची छाबिलदास विद्यालय, कल्याणची सुभेदारवाडा शाळा इत्यादी अनेक. या सर्व शाळांची जबाबदारी असलेल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची धुरा वाहणे हे सोपे काम नाही. त्यांनी तेथे कार्यवाह पद काही वर्षे सांभाळले. तसेच गेली कित्येक वर्षे ते या संस्थेचे खजिनदार म्हणून काम बघत आहेत. त्यासाठी त्यांना रोज ठाण्याहून दादरला जावे लागते. हे काम करताना त्यांनी कधीही या कामाचे निमित्त सांगून शालेय तासिका बुडविल्या नाहीत. ‘शासन शिकविण्यासाठी पगार देत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे माझे कर्तव्य आहे’ ही त्यांची भावना होती. खजिनदार म्हणून काम करताना एक एक पैचा हिशोब तोंडावर असणारे म्हणून त्यांना ओळखले जाते.
ही सर्व कामे करताना त्यांना घरी कुटुंबियांसाठी वेळ देणे कठीण होत असेल. परंतु त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आणि मुलगा-सून खंबीरपणे उभे आहेत म्हणूनच ही कामे करणे त्यांना शक्य झाले. कालच्या समारंभाला त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि दहा वर्षांची नातही उपस्थित होती. त्यांची नात आपल्या आजोबांचा हा कौतुकसोहळा आनंदाने पाहात होती.
तामरस सरांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मिळावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना.
श्री संतोष कारखानीस, माजी विद्यार्थी
आमच्या नशिबामुळे आम्हाला नववी, दहावी, अकरावी आणि बारावी ला असे शिक्षक लाभले की त्यामुळे आमचं आयुष्य घडलं. चितळे सर, विलास जोशी सर, खोल्लम सर, भिडे सर, पटवर्धन बाई आणि तामरस सर ही अग्रेसर नावं. १० वी ला गणित आणि शास्त्र हे विषय इंग्लिश माध्यमातून शिकवावे हा प्रकार आम्ही ९ वीत असताना अमलात आला. पण अर्थातच एकदम १० वी ला हे अशक्य आहे. म्हणून आठवीपासून सुरवात करायची होती. पण आम्ही नववीत. पण तरीही आम्ही तो पर्याय निवडला. म्हणूनही कदाचित असेल, पण आमच्या बॅच ला शिक्षकांचं प्रेम जास्तीच मिळालं. तामरस सर फिजिक्स आणि गणित शिकवायचे.
तामरस सरांचा अमृत महोत्सव ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते एव्हरग्रीन आहेत. सर म्हणजे शिस्त, सर म्हणजे चटपटीतपणा, सर म्हणजे भराभर आणि परफेक्ट शिकवणं, सर म्हणजे टापटीप. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आदर. फक्त आदर, भीती अजिबात नाही. आजही ते खडू उचलून “assume this is a straight line” असं म्हणून फळ्यावर एक लाईन काढतील आणि शिकवायला सुरुवात करतील असंच वाटतं. ती तथाकथित सरळ लाईन कधीच सरळ आली नाही ही गोष्ट वेगळी! पण assume असं म्हणून सर एक पळवाट शोधून काढायचेच. सरळ लाईन मारायचा मक्ता पारनाईक सरांकडे होता.
सरांचं शिकवणं परफेक्ट. शिकवण्यात विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे ही कळकळ. त्यामागचे “माझा वेळ किती जातोय”, “मला ओव्हरटाईम मिळतोय का”, “समोरचे विद्यार्थी इतके ढढ्ढम का आहेत” वगैरे गोष्टींना थारा नाही. शिक्षक जन्मावा लागतो. तसे आमचे तामरस सर आहेत.
शिक्षकांचं ऋण फेडायचं नसतं. मी, माझी पत्नी (तीही त्यांचीच विद्यार्थिनी), माझे १९७८ दहावीचे सगळे विद्यार्थी आणि इतर अनेक….. सर: आम्हाला तुमच्या ऋणात राहणंच आवडेल.
श्री. विवेक दातार, माजी विद्यार्थी