Back

ज. ए. इ. चे मो. ह. विद्यालय, ठाणे

२ नोव्हेंबर १८९२ रोजी कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी कै. केशव भगवंत ताम्हणे यांच्या सहकार्याने ठाणे येथे एक खाजगी मिडल स्कूल सुरू केले. विद्यालयासाठी जागा मिळाली, तीही ठाण्यातील सरकारी बी. जे. हायस्कूल शेजारी. ठाण्यातील बी. जे. हायस्कूल  हे सर्वात जुने माध्यमिक विद्यालय. या शाळेतील प्रवेश प्रतिष्ठेचे लक्षण  मानले जाई. सरकारी शाळेशेजारी खाजगी शाळा काढण्याचे साहस कै. अक्षीकर व कै. ताम्हणे यांनी त्याकाळी केले.

शाळेमध्ये प्रथम वर्षी अवघे ३५ विद्यार्थी होते. १९ फेब्रुवारी १८९४ रोजी शाळेस मान्यता मिळाली व शाळा अनुदानास पात्र झाली. त्यावेळी शाळेचे ‘ठाणे इंग्लिश स्कूल’ असे नाव होते. सुरवातीस फक्त इ. १ ली ते ३ री पर्यंत वर्ग होते. १९१० साली ८९ विद्यार्थी असल्याची नोंद आहे. १९१८ साली इ. ५ वी व १९२० साली इ. ६ वी सुरु करण्यात आली. त्यावेळी शाळेत ३०७ विद्यार्थी असल्याची नोंद आहे.

कालांतराने शाळेसाठी जागा कमी पडू लागल्याने ठाणे खाडीजवळील मोतीलाल हरगोविंददास यांच्या बंगल्यातील काही भाग भाड्याने शाळेसाठी घेण्यात आला. त्यावेळी शेठ नगीनदास ठाणावाला व संस्था यांच्यामध्ये करार झाला व शाळेचे ‘मोतीलाल हरगोविंददास विद्यालय’ असे नामकरण करण्यात आले.

१९२२-२३ साली ९ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मॅट्रिक्युलेशन परीक्षेस बसली. १९३१ सालापासून शाळेत मुलींना प्रवेश देण्यात आला. १९३४ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षेत दोन विद्यार्थिनींना पाठविण्यात आले. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढल्याने १९४२ साली प्रभात सिनेमा समोर संस्थेने सध्याची इमारत असलेली जागा ३५०० चौरस मीटर विकत घेतली व इमारत बांधली. सदर इमारतीत वर्ग भरू लागले. जागा अपुरी पडू लागल्याने सदर इमारतीवर दुसरा मजला १९५५ साली बांधण्यात आला. असे असूनही जागा अपुरी असल्याने स्टेशन रोडवरील फुलवाडीत ४ वर्ग दुवक्त भरत. शाळेसाठी प्रशस्त क्रीडांगण असावे या उद्देशाने संस्थेने नगरपालिकेकडून १५०० चौरस मीटरचा प्लॉट १९५९ साली विकत घेतला. त्यावेळी शिवाजी पथ अस्तित्वात नव्हता व शाळेची जागा प्रभात सिनेमा सध्याचे कल्याण ज्वेलर्सच्या हद्दीपर्यंत होती. कालांतराने शाळेमध्ये असलेल्या सभागृहाचे प्रयोगशाळेत रूपांतर करून खोल्या उपलब्ध करण्यात आल्या व फुलवाडीतील सर्व वर्ग बंद होऊन संपूर्ण शाळा एकाच इमारतीत भरू लागली. १९६१ साली शालांत परीक्षेत इयत्ता अकरावी शाळेचा कुमार हेमचंद्र प्रधान महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला. २ नोव्हेंबर १९४१ ते २ नोव्हेंबर १९४२ हे शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष शाळेने उत्साहात साजरे केले.

  • अमृत महोत्सव

१ नोव्हेंबर १९६६ ते २ नोव्हेंबर १९६७ हे शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष शाळेने थाटात साजरे केले. मात्र या समारंभात दुःखाची झालर होती. एका तपाहून अधिक काळ मो. ह. विद्यालयाची सेवा केलेले सर्वांचे लाडके व आवडते शिक्षक श्री. नि. गो. पंडितराव यांचे दुःखद निधन अमृत महोत्सवी वर्षात झाले. त्यामुळे अमृतमहोत्सवाचा सोहळा पुढे ढकलावा लागला. महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर हरिभाऊ पाटसकर यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आर. जी. गोखले यावेळी उपस्थित होते. ‘माध्यमिक शिक्षणातील समस्या’ या विषयावर परिसंवाद, विश्राम बेडेकर लिखित ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाचा प्रयोग, शाळेतील शिक्षकांनी सादर केलेले ‘शिवधनुर्भंग’ ही एकांकिका व शिक्षक शिक्षिकांनी सादर केलेली मो. ग. रांगणेकर यांची ‘आजचे संसार’ ही विनोदी एकांकिका, कैलासवासी के. जी. अक्षीकरांच्या हस्ते पारितोषिक वितरण, हरी गोविंदराव उर्फ भाऊसाहेब वर्तक यांच्या उपस्थितीत समारोप व स्मरणिका प्रकाशन ही या महोत्सवाची वैशिष्ट्ये सांगता येतील. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने निधी संकलन करून शाळेत खुल्या रंगमंचाची निर्मिती झाली व संस्थेसाठी, शाळेसाठी कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारा स्त्रोत निर्माण झाला.

१९७५ साली शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. या कनिष्ठ महाविद्यालयाची घडी बसविण्यासाठी शिक्षकांनी अपार कष्ट घेतले. आज या महाविद्यालयात शास्त्र-कला-वाणिज्य व अधिक दोन स्तरावरील अभ्यासक्रम सुरू आहेत. या व्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, टेक्निकल कोर्स इत्यादी अभ्यासक्रम राबविले जातात. शाळेच्या एकूण सहा वेगवेगळ्या सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. अशा प्रकारचे सातत्याने अभ्यासक्रम राबविणारी व कायम ९०% च्या वर निकाल असलेली महाराष्ट्रातील एकमेव शाळा असावी, असे वाटते.

मो. ह. विद्यालयाच्या आजी-माजी शिक्षकांनी एक आगळावेगळा उपक्रम १९७५ सालापासून शाळेत राबविला आहे. शाळा म्हणजे माहिती व विचारांचा पुरवठा करणारा कारखाना नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त उपजत गुणांना कौशल्याला वाव देण्याची, तसेच त्यांच्या सर्जनात्मक गुणांना आवाहन करण्याची संधी उपलब्ध करून देणारे ते एक मंदिर आहे, अशी शिक्षकांची भावना आहे. यामुळे, दैनंदिन अध्यापन व्यतिरिक्त योजना प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्यासाठी १ जुलै १९७५ रोजी अभिरुची मंडळाची स्थापना झाली. प्रत्येक उपक्रमासाठी संस्थेकडे आर्थिक सहाय्य  मागणी शक्य नसल्याने शाळा पातळीवर स्वतंत्र निधी उभारून त्यातून विद्यार्थी शिक्षक सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आयोजित केले जावेत, ही संकल्पना यामागे होती. विद्यार्थ्यांसाठी ॲप्टीट्यूड टेस्ट, व्यवसाय मार्गदर्शन, बुद्ध्यांक चाचणी, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, छंद वर्ग, निसर्ग मंडळ, महिलांसाठींचे वर्ग, गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षकांसाठी उद्‌बोधक व्याख्याने इत्यादी नानाविध कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.

१९८० च्या दशकात शाळेच्या इमारत दुरुस्तीचा विचार झाला, मात्र, दुरुस्ती पेक्षाही इमारत पाडून नव्याने बांधायचा सल्ला स्ट्रक्चरल इंजिनियरने दिला. संस्थेने, शाळेने हे आव्हान स्वीकारले व १९८६ ते १९८९ या काळात तळमजला अधिक दोन मजली अशी सुसज्ज २६ खुल्या, स्वतंत्र प्रयोगशाळा, ग्रंथालय, चित्रकला कक्ष असलेली इमारत बांधून पूर्ण केली. सहाय्यक शिक्षक श्री. शिरीष पितळे यांना जिल्हा पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

२ नोव्हेंबर १९९१ ते २ नोव्हेंबर १९९२ या कालावधीत शाळेचा शतक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. दिनांक २ नोव्हेंबर १९९१ रोजी सकाळी सरस्वती पूजन व सरस्वतीची पालखी, ग्रंथदिंडी, नेत्रदीपक चित्र, सायंकाळी ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते उद्घाटन, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सुमारे ४० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांच्या व नाटकांचा आशय व्यक्त करणारे रांगोळी प्रदर्शन, कैलासवासी अक्षीकर व कैलासवासी ताम्हणे यांच्या तैलचित्राचे अनावरण, अक्षीकर, ताम्हणे व ठाणावाला कुटुंबीयांची उपस्थिती, इत्यादी अनेक वैशिष्ट्यांमुळे उद्घाटन सोहळा संस्मरणीय झाला.

शतक महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचे आठवणी कथन, संगीत रजनी, शहर पातळीवर लंगडी, खो खो, कबड्डी स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, देशभक्तीपर गीत स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, ‘मराठी अस्मितेवरील आक्रमण’ हा परिसंवाद, माजी विद्यार्थ्यांची शास्त्रीय संगीत रजनी, शिक्षक दिनानिमित्त शाळा कॉलेजात उच्च पदावर काम करीत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, विविध गटांमध्ये माजी विद्यार्थ्यांची संमेलने, इत्यादी, अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

शतक महोत्सवी वर्षाचा समारोप ३० ऑक्टोबर १९९२ ते १ नोव्हेंबर १९९२ या कालावधीत संपन्न झाला. यात सुगम संगीत रजनी, ‘वैद्यकीय व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात’ या विषयावर परिसंवाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समारोप सुप्रसिद्ध गायक संगीतकार श्री. सुधीर फडके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ‘मंथन’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

  • शतकोत्तर दशकपूर्ती महोत्सव

२ नोव्हेंबर २००१ ते २ नोव्हेंबर २००२ या कालावधीत शाळेने शतकोत्तर दशकपूर्ती वर्ष साजरे केले. शाळेच्या इमारतीची डागडूजी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती ही कामे या वर्षात निधी संकलन करून पूर्ण केली. ठाण्याचे खासदार माजी विद्यार्थी श्री. प्रकाश परांजपे यांनी खासदार निधीतून शाळेस रक्कम रुपये  ८,५०,०००/- ची मदत केली. या वर्षात ठाण्यामधील डॉक्टरांसाठी एक मेडिकल कॉन्फरन्स, शाळेतून निवृत्त झालेल्या माजी शिक्षक शिक्षकेतरांचा सत्कार, संगीत रजनी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शतकोत्तर दशकपूर्ती वर्षाचा समारोप १४-१५ नोव्हेंबर २००३ रोजी झाला. १४ नोव्हेंबर २००३ रोजी संगीतकार श्री. श्रीधर फडके यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. माजी विद्यार्थी ‘संगीत रजनी’ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात खासदार श्री. सतीश प्रधान व श्री. प्रकाश परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. १५ नोव्हेंबर २००३ रोजी न्यायमूर्ती श्री. अभय ओक, मुंबई टाटा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. प्रमोद कोदे व कुटुंब न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती सुनंदा भिडे-जोशी यांचा सत्कार लोकायुक्त श्री. विजय टिपणीस यांच्या हस्ते करण्यात आला.

याचवेळी शाळेच्या ग्रंथालयास गुरुवर्य स. वि. कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले. २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात इमारत दुरुस्ती नूतनीकरण व इमारत विस्तार प्रकल्प हाती घेण्यात आला. सदर प्रकल्पांतर्गत दोन मजल्यांचे बांधकाम, चौथ्या मजल्यावर भव्य दिव्य अकरा हजार चौरस फुटांचा हॉल, तिसऱ्या मजल्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गांसाठी मोठ्या वर्ग खोल्या, इत्यादी बांधकाम पूर्ण झाले आहे. संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळातील तरुण उत्साही संचालकांनी शाळेच्या भविष्यातील वाटचालीचा विचार करून शाळेचे रंग रूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. शाळेच्या नवीन हॉलचे उद्घाटन शिक्षण मंत्री माननीय श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१६ मध्ये झाले.

  • शतकोत्तर रौप्य महोत्सव

शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवास २ नोव्हेंबर २०१६ पासून सुरुवात झाली. शाळेचे माजी विद्यार्थी व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री. अभय ओक यांच्या शुभहस्ते महोत्सवाचा प्रारंभ २ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डिसेंबर २०१६ मध्ये परदेशस्थ माजी विद्यार्थी संमेलन डॉक्टर श्री. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत पार पडले.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा अंतर्गत कायापालट करण्याचा संकल्प केला. विविध शैक्षणिक वर्षातील बॅचेसनी एकत्र येऊन अंतर्गत सजावटीचे उपक्रम राबविले. १९७१ च्या बॅचने गुरुवर्य स. वि. कुलकर्णी ग्रंथालय, १९७४ च्या बॅचने चित्रकला कक्ष, तसेच अन्य बॅचेसने विविध वर्ग खोल्यात कायापालट घडविला आहे. परदेशस्थ माजी विद्यार्थिनी सुनीती माने, माजी विद्यार्थी श्री. महेश देसाई यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. प्रत्येक वर्गात आवश्यक बेंचेसना पॉलिश, अंतर्गत रंगकाम, दारे-खिडक्या दुरुस्ती, आवश्यक प्रकाश वायूवीजनाची सोय, आवश्यक फर्निचर इ. बाबी लक्षात घेऊन बदल घडविले आहेत. संस्थेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीतर्फे प्रथितयश माजी विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थ्यांनी घेतलेली मुलाखत हा प्रकल्प वर्षभर राबविला गेला.

शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शाळेत क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली असून बास्केटबॉल, मल्लखांब व कराटे या खेळांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. शाळेमध्ये छोटेखानी व्यायाम शाळा सुरू आहे. तसेच नालंदा नृत्य निकेतन तर्फे नृत्य प्रशिक्षणाचे वर्ग सुरू आहेत. महोत्सवाचा समारोप नोव्हेंबर २०१७ मध्ये संपन्न झाला.

शाळेचे माजी संस्कृत शिक्षक कैलासवासी द. के. आचार्य यांच्या प्रेरणेने, अभिरुची मंडळ व मो. ह. विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रतिवर्षी एक आजी व एक माजी शिक्षकाचा सत्कार गुरु पौर्णिमेच्या दिवशी केला जातो, गेली २५ हुन अधिक वर्षे सतत हा उपक्रम सातत्याने शाळेत राबविला जातो. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी असतात.. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम गेली ४५ वर्षे सातत्याने संपन्न होतो.

माध्यमिक विभागात झपाट्याने कमी होणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन संस्थेने २०१७ पासून CBSE अभ्यासक्रमाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे.

132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात, विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम