Back

कै. गोपाळ नारायण अक्षीकर

कै. गोपाळ नारायण अक्षीकर

ज. ए. इ. चे आद्य संस्थापक

जन्म : २५ सप्टेंबर १८६४ | मृत्यू : १६ मार्च १९१७

बहुजनांसाठी शिक्षण सुविधा
स्वप्न आपले होते,
स्वार्थाचा तर स्पर्शही नव्हता
सर्वस्व ध्येयास अर्पिले होते!

संख्यात्मक विकास झालाच,
विकास गुणात्मक करणे आहे,
अभिवादन आपल्या स्मृतीस करुनी,
पुढे जावयाचे आहे!!

तीन दशकात भवताल सारा,
सतत बदलत आहे,
नवनवी आव्हाने समोर,
निर्धार सामोरे जाण्याचा आहे!

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर या संस्थेचे संस्थापक कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांचा जन्म रायगड (तेव्हा कुलाबा) जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ‘अक्षी’ या गावी २५ सप्टेंबर १८६४ रोजी झाला. गावात ते पाटील या आडनावाने प्रसिद्ध होते. कै. अक्षीकरांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. पुण्याला न्यु इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपूळणकर यांच्या हाताखाली ते शिक्षण घेऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

‘शिक्षणात स्वावलंबन’ या उदात्त हेतूने १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या त्रयींचे आचार, विचार व चारित्र्य यापासून स्फूर्ती घेऊन कै. गो. ना. अक्षीकर यांनी शिक्षण-प्रसाराच्या कार्यास स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय केला, आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजासाठी शाळा काढण्याचे ठरविले, व १८८९ साली दादर येथे शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. २ जून १८८९ रोजी दादर येथे मराठी शाळा व इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर १८९० मध्ये कल्याणला इंग्लिश स्कूल, १८९२ मध्ये इंग्लिश स्कूल, ठाणे या शाळा सुरू केल्या.

सुरू केलेल्या शाळा सुस्थापित मध्यवर्ती संस्थेच्या अधिपत्याखाली असल्याशिवाय त्यांचा उत्कर्ष होणार नाही हे लक्षात घेऊन कै. अक्षीकरांनी २४ एप्रिल १८९२ रोजी ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेच्या ४५ शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी संस्थेच्या मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यांमध्ये ९ पूर्व प्राथमिक, ९ प्राथमिक, ११ माध्यमिक, ७ उच्च माध्यमिक या मराठी माध्यमाच्या शाळा, २ इंग्रजी माध्यमाच्या, ४ CBSE शाळा व एक महिला महाविद्यालय आहे. संस्थेत एकूण १७००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ४७५ शिक्षक, १५० शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्या सेवेत आहेत.

कै. गो. ना. अक्षीकर  हे मितभाषी आणि प्रसिद्धी पराङमुख होते. साधी राहणी, दयाशील वृत्ती, संभाषण कुशलता या गुणांमुळे ते सर्वांना प्रिय होते. कै. अक्षीकरांनी आपल्या उण्यापुर्‍या 28 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीत केलेले शैक्षणिक कार्य केवळ प्रचंड व अभूतपूर्व म्हणावे लागेल. त्यांना ‘बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक’ या नावाने संबोधले जाते. त्यांचे कार्य सतत सर्वांना प्रेरणा देत राहिल. संस्था येतात आणि जातात पण कै. अक्षीकरांसारखी त्यागी, निष्ठावान माणसे, आपल्या अफाट कार्यामुळे अमर होतात.

132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

देह त्यागता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी!

समर्थ रामदास स्वामी