आजी-माजी शिक्षकांना जोडणारा दुवा
अभिरूची मंडळ
मो. ह. विद्यालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अभिरूची मंडळ’!
1975 साली या मंडळाची स्थापना मो. ह. विद्यालयाच्या आजी-माजी शिक्षकांनी एकत्र येऊन केली. शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे केवळ माहिती आणि ज्ञान यांच्या रुपात न देता, विद्यार्थ्यांच्या सुप्त, उपजत गुणांना, कौशल्याला वाव देण्याची तसेच त्यांच्या सर्जनात्मक गुणांना आवाहन करण्याची संधी उपलब्ध करुन देणारे ते एक मंदिर आहे, या भावनेतून झाली. यासाठी दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त योजना, प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते राबवण्याचा मानस होता.
प्रत्येक उपक्रमासाठी संस्थेकडे आर्थिक सहाय्य मागणे शक्य नसल्याने शाळा पातळीवर स्वतंत्रनिधी उभारून त्यातून विद्यार्थी / शिक्षक सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आयोजित केले जावेत, ही संकल्पना यामागे होती.
विद्यार्थ्यांसाठी Aptitude Tests, व्यवसाय मार्गदर्शन, बुद्ध्यांक चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, छंद वर्ग, निसर्ग मंडळ, महिलांसाठीचे वर्ग,गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साहाय्य, शिक्षकांसाठी उद्बोधक व्याख्याने, गुरूपौर्णिमा, आजी – माजी आदर्श शिक्षक पुरस्कार इ. कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.
यातील गुरूपौर्णिमा हा कार्यक्रम विशेषत्वाने साजरा केला जातो. शाळेचे माजी संस्कृत शिक्षक कै. द. के. आचार्य यांच्या प्रेरणेने अभिरूची मंडळ व मो. ह. विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी एका आजी व एका माजी शिक्षकाचा सत्कार गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला जातो. गेली 28 वर्षे हा उपक्रम सातत्याने शाळेत राबविला जातो. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी असतात. आदर्श शिक्षक पुरस्कारासठी कै. द. के. आचार्य यांनी 750/- रु. गुरूवर्य स. वि. कुलकर्णी यांनी 1,250/- रु. माजी शिक्षक कै. द. शं. गोगटे यांनी रू. 3,000/-रु. माजी विद्यार्थी श्री. शिशीर शिंदे यांनी रू. 3,500/- अभिरूची मंडळाकडे सुपुर्द केले आहेत. 1995 पासून हा उपक्रम सुरू आहे. गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम गेली 48 वर्षे सातत्याने संपन्न होतो आहे.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश, वह्या व शालेय पुस्तकांचे वाटप करण्याचा उपक्रम आजतागायत सुरू आहे. पूर्वीचे बहुसंख्य शिक्षक सेवानिवृत्त झाले. पण, शिक्षकांची नवीन पिढी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिरूची मंडळाची धुरा समर्थपणे सांभाळीत आहे. आजीमाजी शिक्षकांना जोडणारा हा दुवा असाच सुरू राहील व नवीन जोमाने आपल्या कक्षा विस्तारत राहील, असा विश्वास वाटतो.