Back

बातम्या

सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मा. मेधा ताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न
(४ जानेवारी,  २०२४)

ठाण्यातील मोह विद्यालय महाराष्ट्रातील पहिली हरित शाळा, माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी
पर्यावरणीय संसाधनाचा वापर आणि त्यातून शिक्षण प्रवाह सुरू ठेवण्याच्या उद्देशाने ठाण्यातील मोह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारण्यात आले आहे.

पर्यावरणीय संसाधनाचा वापर आणि त्यातून शिक्षण प्रवाह सुरू ठेवण्याच्या उद्देशाने ठाण्यातील मोह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारण्यात आले आहे. शाळेच्या शतकोत्तरी सोहळ्याच्या निमित्त माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीतून सौर उर्जा प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन समाजसेविका मेधाताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले..

ठाण्यातील मोह विद्यालय ही १३२ वर्ष जुनी शाळा आहे. या शाळेचा वर्षभरातील आर्थिक खर्चामध्ये एक लाखाहून अधिक खर्च हा वीज वापरासाठी होत होता. दैनंदिन कामासाठी विद्यालयात वापरली जाणारी वीज आणि त्यातून येणारा आर्थिक खर्च कमी व्हावा याकरिता विद्यालयात अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करून सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेचे माजी मुख्याध्यापक स. वि. कुलकर्णी यांच्या नावे सौरऊर्जा निर्मिती आणि जनजागृती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पाची संकल्पना शाळेच्या शतकोत्तरी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नावारूपास आली. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाकरिता माजी विद्यार्थी संजय मंगला गोपाळ आणि लतिका सुप्रभा मोतीराम या दाम्पत्यांनी विद्यालयास आर्थिक मदत केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज बचत, आर्थिक बचत तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी, ४ जानेवारीला सुप्रसिद्ध पर्यावरण प्रेमी, नर्मदा बचाव आंदोलक, समाजसेविका श्रीमती मेधा पाटकर यांच्या शुभहस्ते मोह विद्यालयाच्या सभागृहात  संपन्न झाले. सदर सोहळ्यास ज. ए. इ. दादर कार्याध्यक्ष मा. श्री. शैलेंद्र साळवी अध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी, समता विचार प्रसारक कार्यकर्ते मा. श्री. संजय मंगला गोपाळ  विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रकल्प कसा असणार ?
सौरऊर्जा प्रकल्प १९.५ किलोवॅटचा आहे. यासाठी एकूण साडेबारा लाख खर्च आला आहे. या प्रकल्पात थेट सुर्यप्रकाशामार्फत ऊर्जानिर्मित केली जाणार आहे. ही वीज महावितरण कक्षाकडे पुरवली जाणार आहे. विद्यालयात वापरली जाणारी वीज सौर ऊर्जेपासून तयार केलेली असणार आहे. तसेच रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी यातून तयार होणारी ऊर्जा महावितरण कक्षाला वापरता येणार आहे. देवाण घेवाण या पद्धतीने सौर ऊर्जा प्रकल्प कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा प्रकल्प कसे कार्य करतो हे पाहण्यासाठी जनजागृती केंद्रदेखील उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे वीजेच्या वापरासाठी होणारा खर्च कमी होणार आहे.

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम